साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही महिन्यापासून राज्याचे राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. तर काही पक्षांच्या सुनावण्या कोर्टात सुरु असतांना आता राज्यातील जनतेचे लक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या निर्णयावर लागून आहे.
सातारामधील जलमंदिर पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावे, असा सल्लाही उदयनराजेंनी दिला. खासदार उदयनराजे म्हणाले, माझी निवडणुकीची खाज आता भागलेली आहे. पत्रकारांना उद्देशून मी आता तुमचा प्रचारक म्हणून काम करतो, असा टोलाही उदयनराजे यांनी लगावला. उदयनराजे भोसले म्हणाले की, वयाची पन्नास वर्षे बघता बघता उलटली. हाफ चड्डीतून फुलपॅंटमध्ये कधी आलो आणि शाळेतून कॉलेज संपून राजकारणात कधी पडलो हे समजलेच नाही. उदयनराजे म्हणाले, माझ्या मुलांना आता मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.
जसे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 ते 60 या दरम्यान असते. त्याचप्रमाणे राजकारण्यांचेही निवृत्तीचे वय असावे आणि राजकारणातही ते लागू झाले पाहिजे तरच तरुणांना संधी मिळेल. तरुणांना संधी मिळाली पाहिजे असे म्हणत वयाने ज्येष्ठ झाले तरी निवडणूक लढवायची. मग कशी मिळणार तरुणांना संधी? असा सवालही खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.







