साक्षीदार | २५ नोव्हेबर २०२३ | पाकिस्तानच्या एका शहरात आगीची भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. एका शॉपिंग मॉलला दि. २५ नोव्हेंबर रोजी शनिवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कराचीतील स्थानिक रुग्णालये आणि पोलिसांनी रुग्णालयांमध्ये नऊ मृतदेह आणण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.
याबाबत स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज शनिवार, २५ नोव्हेंबर लागलेल्या आगीत अकरा जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आली नसून सध्या तपास सुरू आहे.
जिल्हा उपायुक्त अल्ताफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर 22 लोकांना मॉलमधून वाचवण्यात आले आणि त्यांना जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटर जेपीएमसीमध्ये हलवण्यात आले, त्यापैकी एकाचा उपाचाराआधीच मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेनंतर चौथ्या मजल्यापर्यंत इमारत रिकामी करण्यात आली आहे, तर पाचवा आणि सहावा मजला रिकामा करण्याचे काम सुरू आहे.अग्निशमन आणि बचाव कार्य विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत बोलताना त्यांना सकाळी 6:30 वाजता घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी 8 अग्निशमन दल, दोन स्नॉर्कल्स आणि दोन बाउझर घटनास्थळी पाठवले आणि आग आटोक्यात आणल्याचे सांगितले. सिंधचे महानिरीक्षक (आयजी) रिफत मुख्तार यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या सूचना दिल्या होत्या. अग्निशमन दलाला कोणतीही अडचण न होता तेथे पोहोचता यावे यासाठी रस्ता मोकळा करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.