मुलगा होत नाही, पतीसाठी नवीन घराची मागणी तर झालेल्या छळाला कंटाळून विवाहिता पल्लवी योगेश पाटील (३५) यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी दिली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पती योगेश पाटीलसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पल्लवी पाटील या विवाहितेच हिचे योगेश पाटील यांच्याशी सन २०१२मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या संसारवेलीत दोन मुली असून अधून-मधून ती माहेर येत होती. त्यावेळी तिने मुलगा होत नाही म्हणून सासरचे टोचून बोलतात व शारीरिक, मानसिक छळ करून मारहाण करतात, असे वडील गणेश बन्सी चौधरी (रा. बहादरपूर, मध्यप्रदेश) यांना सांगितले होते. हा त्रास असह्य झाल्याने त्या सन २०१९ मध्ये माहेरी निघून आल्या. काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी चांगले वागण्याचे आश्वासन देवून विवाहितेला घरी नेले. परंतू, त्यानंतरही पुन्हा छळ सुरूच होता. २१ डिसेंबर २०२३ रोजी पल्लवी यांनी वडिलांना फोन करून सांगितले की, पती नवीन घर मागत असून तुम्ही नवीन घर घेवून द्या, नाही तर सासरचे लोक जीवंत ठेवणार नाही. अखेर २४ डिसेंबर रोजी सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून पल्लवी यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद पल्लवी यांच्या वडिल गणेश बन्सी चौधरी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून बुधवार, ३ जानेवारी पती योगेश पाटील, सासरे प्रेमचंद पाटील, सासू इंदूबाई पाटील, जेठ देवानंद पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.