साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचा शोध पोलिसाकडून सुरु होता अखेर त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पण त्याने आता यात गंभीर आरोप देखील केला आहे.
ललित पाटील याला कोर्टात हजर केलं जात असताना ललित पाटीलने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यात त्याने “मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं. यात कुणाकुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावं सांगणार आहे,” असं वक्तव्य केलं. याबाबत विचारलं असता मुंबई पोलिसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ललित पाटीलला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलीस म्हणाले, “याबद्दल भारतीय दंड विधान कलम २२४ नुसार ललित पाटीलवर एक स्वतंत्र गुन्हा पुण्यात दाखल आहे. पुणे पोलीस त्यांच्या तपासात या दृष्टीने काम करत असतील.” या प्रकरणात अनेक सत्ताधारी नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तसेच या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणीही होत आहे. याबाबत विचारलं असता पोलीस म्हणाले, “आमचं प्रकरण अमली पदार्थांबाबत आहे. आम्ही अमली पदार्थांचं मोठं रॅकेट उध्वस्त केलं आहे. आम्ही अमली पदार्थांची फॅक्टरी चालवणाऱ्यांबाबत तपास करत आहोत.” “ड्रग्जचं उत्पादन आणि त्यांचा पुरवठा यात दोघांचाच सहभाग होता. तो सहभाग स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही पाठपुरावा करून अटक केली. आतापर्यंत याप्रकरणी आम्ही १४ जणांना अटक केली आहे. सकाळी ललित पाटीलला अटक केली आहे,” अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.