साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | नशिराबाद तालुक्यातील शेळगाव जवळील धरणात हातपाय धुण्यासाठी गेलेले रमेश दामू कोळी (६०, रा. शेळगाव) हे पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतमजुरी करणारे रमेश कोळी हे शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता शेळगाव धरणाजवळील मंदिरात गेले होते. त्यावेळी ते धरणाजवळ हातपाय धुण्यासाठी गेले असता, तोल जावून पाण्यात पडले. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाहीशेळगाव गावातील हेमंत कोळी, भगवान कोळी आणि सुभाष कोळी हे दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता शेळगाव धरणात पोहण्यासाठी गेले असता रमेश कोळी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी नशिराबाद पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरिश पाटील करीत आहेत.