साक्षीदार | १२ नोव्हेबर २०२३ | राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तूर्त स्थगित झाल्यावर त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे त्यांना 10 दिवसांच्या उपचारानंतर आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डिस्चार्ज दिला जाणार आहे. स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डिस्चार्जनंतर आपण आंतरवाली सराटी येथे जाणार असल्याचे असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
कन्नडमधील देवगाव रंगारी येथे चार दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाकरिता संजय सोनवणे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या घरी शनिवारी रात्री नऊ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. डॉक्टरांना काहीही न सांगताच, डॉक्टरांची परवानगी न घेताच आपण तिकडे गेलो, असे मनोज जरांगे म्हणाले. यावेळी ‘आपण काळजी करू नका, मी आपल्या पाठीशी आहे. आपण धीर धरावा व मुलांचे संगोपन करा, आपण जिजाऊंच्या लेकी आहोत हे ध्यानात असू द्या’ असे सांगून मनोज जरांगेंनी कुटुंबाला धीर दिला.
तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो की यापुढे एकानेही आत्महत्या करु नका, असे आवाहनही मनोज जरांगेंनी केले. तसेच, गोरगरीब संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत दिवाळी साजरी करणार नाही, याचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केला. दिवाळीनिमित्त कुटुंबीयांशी संवाद साधला का? यावर मनोज जरांगे म्हणाले, अजून तरी त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. ते दिवाळीत नेमके काय करताय? हेही माहिती नाही. मात्र, मी दिवाळी साजरी करणार नाही म्हटल्यावर तेही दिवाळी साजरी करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.