back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

Ajitdada | अजितदादांच्या रुपाने आपण “मास लीडर” गमावला…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Ajitdada
Ajitdada

Ajitdada धरणगाव | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री कै. अजितदादा पवार यांचा नुकताच विमान अपघातात दुर्दैवी व करूण रीतीने अंत झाला. दादांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याने व देशाने एक “मास लीडर गमावला ज्याला बहुजन समाजाच्या समस्यांची खोलवर जाणीव व गाढा अभ्यास होता.

- Advertisement -

मागील 35 ते 40 वर्षांपासून सक्रिय राजकारणात ठसा उमटविणारे तसेच 06 वेळा ज्यांनी महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषविले असे कै. अजित अनंतराव पवार म्हणजे अतिशय अभ्यासू नेतृत्व होते. अजितदादांकडे जर कोणी काही कामाच्या निमित्ताने गेले तर त्यासाठी भलमोठं पत्र लिहून समस्या मांडावी असं बंधन नसायचं. एखाद्या साद्या कागदाच्या तुकड्यावर जरी काही समस्या लिहून दिली तरी त्यावर तोडगा निघायचा परंतु जर त्या चिठ्ठीवर कुठे काना – मात्रा किंवा वेलांटी चुकलेली असेल तर त्याबाबत आधी सूचना मिळायची. ज्याचं काम चौकटीत बसण्या सारखं किंवा होण्यासारखं नसेल त्याला जागेवर नकार मिळायचा आणि ज्याचं काम होण्यासारखं असेल त्यासाठी काय प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती करण्याची दादांची तयारी असायची. असं म्हणतात मोठ्या झाडाच्या सावलीत लहान रोपटे विकसित होत नाहीत परंतु या नियमाला दादा अपवाद ठरले कारण देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेबांचे पुतणे ही ओळख असलेल्या व्यक्तीने त्यापलीकडे स्वतःचं वलंय निर्माण केलं ते फक्त त्यांच्या कामाच्या सचोटीने. अजितदादा म्हणजे कमालीचे वक्तशीर आणि शिस्तप्रिय नेते होते. सकाळी 5 वाजेपासून सुरु झालेला दिवस लोकांच्या समस्या सोडविण्यात मावळायचा. सुरवातीच्या काळात केंद्रात निवडून गेलेल्या दादांना केंद्र मानवलं नाही म्हणून त्यांनी राज्यातचं राहणं पसंत केलं.राज्यातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, महिला, वंचित, उपेक्षित, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार या सर्व घटकांच्या समस्यांची जाणीव दादांना होती. अडलेल्या नडलेल्या लोकांचे दुःख समजून घेतलं पाहिजे व त्यांना शक्य तेवढी मदत शासन स्तरावर केली पाहिजे यासाठी ते आग्रही असायचे.

अजितदादा एक अतिशय कणखर व परखड व्यक्तिमत्व होते त्यासोबतच त्यांना विनोद बुद्धीची खूप मोठी देणगी होती कारण त्यांच्याएवढा हजरजबाबी माणूस माझ्यातरी पाहण्यात नाही. आपण जे बोललं त्यावर ठाम राहणं, सभेत भाषण करतांना विशिष्ट चौकटीत भाषण करणं त्यांना कधी जमलंच नाही. दादांचा स्वभाव कठोर होता, ते शिस्तीचे भोक्ते होते, पोकळ स्तुती त्यांना आवडत नसे त्यामुळे त्यांच्याजवळ जायला चारवेळा विचार करावा लागे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट निर्माण झाली तेव्हा माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले आणि आम्ही साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला परंतु सरकारमध्ये राहून पुरोगामी ओळख टिकवून ठेवणं दादांना जमलं ते इतरांना जमेलच असं नाही. दादांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्याची अनेक कारणं असू शकतात परंतु जेव्हा दादांच्या निधनाची बातमी माहित झाली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता प्रत्येक कार्यकर्त्यांने व दादांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी बारामतीच्या दिशेने धाव घेतली. मी आणि आमचे लहान बंधू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव युवक जिल्हा कार्याध्यक्ष मोहीत पवार बारामती पोहचलेले असेच दादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते होतो. ज्या बारामतीमध्ये सुरवातीला प्यायला सुद्धा पाणी मिळत नव्हते तिथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आज शेती केली जाते यामध्ये पवार परिवारातील दादांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असले तरी बारामती देखील शिक्षणाच्या बाबतीत कुठेही कमी नाहीये. राज्याची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून निर्माण झालेले विद्या प्रतिष्ठान उभारण्यात दादांचा मोलाचा वाटा आहे. विद्या प्रतिष्ठान म्हणजे अशी जागा जिथे दादांचा जनता दरबार भरायचा. या जागेवर दादांचे निस्सीम प्रेम होते, येथील झाडांवर देखील दादांचे बारकाईने लक्ष असायचे. ज्या विद्या प्रतिष्ठानच्या उभारणी साठी दादांनी प्रचंड मेहनत घेतली त्याच मैदानावर दादांचा अंत्यविधी होणं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असावं. मृत्यू हे अटळ सत्य असलं तरी अशा नेतृत्वाचा अपघातात मृत्यू होणं प्रचंड वेदनादायी ठरलं. राजकारणी व्यक्ती म्हटलं म्हणजे त्यांच्या नशिबात नेहमी शिव्यांची लाखोली वाहिली जाते परंतु दादा या नियमाला अपवाद ठरले. व्हीआयपी लोकं एखाद्या मोठ्या नेत्याच्या अंत्ययात्रेत प्रोटोकॉल म्हणून सहभागी होतात परंतु सामान्य माणसाने अगदी आपल्या घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे हंबरडा फोडावा हे दादांच्या अंत्यविधी प्रसंगी बघायला मिळालं. महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेलं लोकं अक्षरशः धाय मोकलून रडत होते, हे दृश्य बघून दादांच्या बद्दल असलेला आदर अधिकच दृढ झाला. आमदार कोणीही होऊ शकतं परंतु मी तुला आमदार करतो असं म्हणणारा नेता तयार व्हायला फार वेळ लागतो. राजकारणाच्या स्टेज वरून राजकारण लंय वंगाळ आहे हे म्हणायला अजितदादारुपी जिगरबाज माणूस लागतो. पवार साहेबांच्या जीवनात प्रचंड मोठा संघर्ष, त्याग आणि समर्पण आहे यात तिळमात्र शंका नाही परंतु या वयात दादा गेल्याने हा सह्याद्रीसुद्धा आतून हादरला. त्याच कारणही तसंच आहे, “तु लंय मोठा बापाचा मुलगा असशील पण तुझ्या बापापेक्षा माझा काका लंय मोठा आहे आणि मी सुद्धा मोठ्या काकांचा पुतण्या आहे” असं म्हणणारा दादा आता साहेबांना कुठेच दिसणार नाही.

- Advertisement -

काळ कोणासाठी थांबत नाही या उक्तीप्रमाणे अजितदादा गेल्यानंतर काल सुनेत्राताई पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 24 जानेवारी रोजी अजितदादा व पवार साहेबांची एक बैठक झाली त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. दादांची अंतिम ईच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात, असं जयंतराव पाटील यांनी कालच सांगितलं. पवार साहेबांनी देखील काल दिलेल्या मुलाखतीत अनेक अप्रत्यक्ष संकेत दिलेत. आगामी काळात काय होणार हे आताच सांगणं कठीण आहे पण एक मात्र नक्की सर्वासामान्य जनतेचा आधार असलेले दादा कधीही परत येणार नाहीत. नियतीने एवढं कठोर का व्हावं हा मोठा गंभीर प्रश्न आहे? कारण दादा गेलेत हे मानायला मन अजूनही तयार होत नाहीये. दादा गेल्यानंतर काही प्रश्न मागे अनुत्तरीत स्वरूपात सोडून गेलेत. विमानाचा अपघात झाला की घातपात? अपघात झाल्यानंतर दादांसह 5 लोकं गेलीत परंतु कागदपत्रे जळाली नाहीत? अपघात झाल्यानंतर लगेचच बॉडी एवढी फुगली कशी? उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नसतांना दादांचे उत्तरकार्य होण्याच्या आधीच शपथविधीची एवढी घाई का?राष्ट्रवादीचे विलीनकरण होण्यात नेमका विरोध कोणाचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे जरी मिळणार असतील किंवा नसतील परंतु एका प्रश्नाचे उत्तर निसंकोच मिळणार तो म्हणजे महाराष्ट्राचा दादा पुन्हा होणे नाही. विलासराव देशमुख, आर आर पाटील, गोपीनाथ मुंडे, विनायकराव मेटे आणि आता अजितदादा पवार ही फक्त व्यक्ती नसून बहुजन समाजाचा बुलंद आवाज होते. दादांच्या रूपाने झालेली हानी कधीही भरून निघणार नाही कारण दादा गेल्याने फक्त पवार परिवाराची नाही तर राज्याची व देशाची खूप मोठी हानी झाली आहे. बुलंद आवाज, कणखर आणि परखड नेतृत्व, सडेतोड बोलण्याची धमक, कमालीची विनोदबुद्धी, बहुजन समाजाचा आधार असलेले दादा गेलेत ते कधीही न परतण्यासाठी. कोर्पोरेट नेते अनेक असतात परंतु ग्रामीण भागातील समस्यांची जाण असलेला “मास लीडर” घडायला प्रचंड वेळ लागतो…

(अजितदादा यांच्या जीवनाचा सखोल आणि सविस्तर मागोवा घेतल्याबद्दल न्यूज 18 मराठीचे मनापासून आभार)

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Ajitdada

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS