Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची तयारी सुरू करत आहेत. साधारणपणे आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असते, परंतु तज्ज्ञांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर रिटर्न भरण्याचा सल्ला दिला आहे. वेळेवर आणि चुका टाळून रिटर्न दाखल करण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आधीच व्यवस्था करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांबाबत जाणून घेऊया.
आयटीआर दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
आर्थिक वर्ष 2024-25 आणि मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयटीआर प्रक्रिया लवकरच सुरू होईल. 31 जुलैपर्यंत ही प्रक्रिया चालू राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय रिटर्न दाखल करण्यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा:
-
पॅन आणि आधार कार्ड: आयकर रिटर्नसाठी पॅन क्रमांक अनिवार्य आहे. पॅन आणि आधार लिंक करणेही बंधनकारक आहे, ज्यामुळे ओळख पडताळणी होते.
- Advertisement - -
फॉर्म 16 (पगारदारांसाठी): कंपनीकडून मिळणारा हा दस्तऐवज तुमच्या पगार आणि कर कपातीचा तपशील देतो. यात टीडीएस (भाग अ) आणि पगार तपशील (भाग ब) असतो. 15 जूनपर्यंत कंपनीला हा फॉर्म द्यावा लागतो.
-
फॉर्म 26एएस आणि एआयएस: फॉर्म 26एएस हे तुमचे कर पासबुक आहे, ज्यात टीडीएस, आगाऊ कर आणि मोठ्या व्यवहारांची माहिती असते. एआयएसमध्ये पगार, व्याज, लाभांश, शेअर्स इत्यादी सर्व उत्पन्न स्रोतांचा तपशील असतो.
-
बँक खात्याचा तपशील: एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास आयएफएससी कोड आणि खाते क्रमांक नीट तपासून भरा, अन्यथा रिटर्नात अडचण येऊ शकते.
-
व्याज प्रमाणपत्र: बचत खाते, एफडी किंवा आरडीवर मिळालेले व्याज बँकेकडून किंवा पोस्ट ऑफिसमधून मिळवा, जे इतर उत्पन्नात गणले जाते.
-
गुंतवणूकीचे पुरावे: कलम 80सी, 80डी अंतर्गत वजावटसाठी जीवन विमा प्रीमियम पावत्या, पीपीएफ, ईएलएसएस, मुलांचे शुल्क, गृहकर्ज कागदपत्रे आणि आरोग्य विमा पावत्या जपून ठेवा.
-
गृहकर्ज आणि मालमत्ता कागदपत्रे: गृहकर्ज व्याजासाठी बँकेकडून प्रमाणपत्र घ्या. एचआरए दावा करत असाल तर भाडे पावती किंवा करारनामा सांभाळा.
-
भांडवली नफ्याचे तपशील: शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा मालमत्ता विक्री केल्यास खरेदी-विक्री पावत्या आणि स्टेटमेंट गोळा करा.
-
परकीय उत्पन्न आणि मालमत्ता (लागू असल्यास): परदेशात उत्पन्न किंवा मालमत्ता असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे.
-
फ्रीलान्स किंवा व्यवसाय उत्पन्न: नफा-तोटा विवरणपत्रे, जीएसटी रिटर्न आणि व्यवसाय चलनांची नोंद ठेवा.
-
आगाऊ कर आणि स्व-मूल्यांकन कर पावत्या: याची पावती सांभाळा.
-
गेल्या वर्षीच्या आयटीआरची प्रत: मागील वर्षाचा रिटर्न आणि कर सूचना तपासून पहा.
लवकरात लवकर रिटर्न भरा
तज्ज्ञांचे मत आहे की, शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहिल्यास तांत्रिक अडचणी किंवा चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत कागदपत्रे गोळा करून रिटर्न दाखल करा. योग्य कागदपत्रांशिवाय रिटर्न रखडण्याची किंवा परतावा मिळण्यास उशीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता पासूनच तयारी सुरू करा आणि करप्रक्रियेत अडचण टाळा!