Chhatrapati Shivaji Maharaj | जळगाव । साक्षीदार न्यूज । इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या वर्षी या स्पर्धेकरिता छत्रपती शिवाजी महाराज – श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ हा विषय घेण्यात आला असल्याचे, बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी कळवले आहे.
बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व व.वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयाच्या स्टेशनरोडवरील सभागृहात प्राथमिक फेरी होणार आहे. या उपक्रमात एकल गटात वय वर्षे ५ ते १० व वय वर्षे ११ ते १५ या वयोगटात तसेच समूह गट अशी विभागणी करण्यात आली आहे. एकल गट १ वय वर्षे ५ ते १० यांना छत्रपती शिवाजी महाराज तर एकल गट २ वय वर्षे ११ ते १५ व समूह गट यांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ते राज्याभिषेक हा विषय देण्यात आला आहे. एकल गटात स्पर्धकांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहोत किंवा त्याकाळातील कोणत्याही व्यक्तिरेखेच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वरुपाने तर एकल गट २ व समूह गटातील स्पर्धकांनी श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक या कालखंडातील शौर्य घटना, विविध प्रसंग, पराक्रम आदी घटनांचे संदर्भ घेत नृत्य, नाट्य, संगीत आदींचा समन्वय साधत प्रभावी सादरीकरण करावयाचे आहे. एकल गटाकरिता जास्तीत जास्त ५ मिनिटे तर समूहाकरिता जास्तीत जास्त १० मिनिटे सादरीकरणाची मर्यादा आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता कोणतीही प्रवेश फी नसून, प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
प्राथमिक फेरीतील प्रत्येक गटातील प्रथम आणि द्वितीय आलेल्या स्पर्धकांची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार असून, ही अंतिम फेरी दि. २३ व २४ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटूंगा, माहीम, मुंबई ४०००१६ येथे आयोजित केली जाणार आहे. अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या सर्व बालकलावंतांचा प्रवास खर्च आयोजकांकडून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त बालकलावंतांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा तसेच नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ७६२०९३३२९४, ८८३०२५६०६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन व.वा.वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, उपाध्यक्ष अॅड. सुशिल अत्रे, उपाध्यक्ष अॅड. प्रताप निकम, कार्याध्यक्ष सी.ए.अनिलकुमार शहा, बालरंगभूमी परिषद जळगावचे उपाध्यक्ष अमोल ठाकूर – हनुमान सुरवसे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, बालरंगभूमी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, पंकज बारी, दिपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, नेहा पवार, दर्शन गुजराथी, सुरेखा मराठे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.