LPG Price | जळगाव | एलपीजी इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या ऑटोरिक्षा चालकांनी ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात जळगाव येथे दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेश कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच मार्गदर्शक राजुभाई मोरे यांच्या उपस्थितीत निषेध नोंदविण्यात येणार आहे. प्रदेश अध्यक्ष शशांक राव साहेब आणि प्रदेश सरचिटणीस विलास भालेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मोर्चे, निदर्शने आणि आंदोलने केली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील लाखो ऑटोरिक्षा एलपीजी (LPG) इंधनावर चालतात आणि दररोज लाखो प्रवासी या सेवांचा लाभ घेतात. मात्र सध्या इंधन टंचाईची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. एलपीजी वितरकांकडून प्रति लिटर ११० ते १५० रुपयांपर्यंत दर आकारले जात असून, काही ठिकाणी पंप बंद ठेवणे किंवा नियमित पुरवठा न करणे अशा प्रकारांमुळे चालकांमध्ये नाराजी वाढली आहे.
या परिस्थितीमुळे अनेक रिक्षा बंद ठेवण्याची वेळ येत असून, चालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- एलपीजी गॅस पंप नियमित सुरु ठेवावेत
- ऑटो रिक्षांसाठी एलपीजी इंधन सामान्य दरात उपलब्ध करून द्यावे
- इंधन दर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात
- कल्याणकारी मंडळाची नोंदणी फी (₹५००) व वार्षिक फी (₹३००) रद्द करावी
- आरटीओकडून नोंदणीसाठी केली जाणारी सक्ती तात्काळ थांबवावी
तसेच, धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटोरिक्षा व मिनिडोर टॅक्सी कल्याणकारी मंडळ स्थापन करताना शासनाने संबंधित संघटनांशी चर्चा न करता निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मंडळात नोंदणी सक्तीची करून रिक्षाचालकांवर अन्याय होत असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे.
या आंदोलनात नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन, वीर सावरकर रिक्षा युनियन, जळगाव महानगर ऑटो रिक्षा चालक मालक युनियन, एकता ऑटो रिक्षा टॅक्सी युनियन, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियन, श्रमजीवी ऑटो रिक्षा कामगार फेडरेशन, भाजपा वाहतूक आघाडी सेल, जळगाव जिल्हा ऑटो रिक्षा पंचायत, श्री छत्रपती शिवाजी महाराज मिनिडोर चालक मालक संघटना, महर्षी वाल्मिकी रिक्षा युनियन यांसह विविध संघटनांचा सहभाग राहणार आहे.







