Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत आहे. या परिस्थितीची दखल घेत आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील केळीचे दर पारंपरिकरित्या बऱ्हाणपूर मंडीतील भावांवर अवलंबून असतात. सध्या बऱ्हाणपूर येथे केळीला प्रति क्विंटल सुमारे १६०० ते १७०० रुपये दर मिळत असताना, जळगावातील काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून केवळ ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी होत असल्याचे समोर आले आहे.
या दरातील मोठ्या तफावतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, याला पिळवणुकीचे स्वरूप असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रमुख मागण्या
- व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची सखोल चौकशी
- दोषींवर कठोर कारवाई
- केळी उत्पादकांना न्याय्य बाजारभाव मिळण्यासाठी उपाययोजना
- बाजारभाव नियंत्रणासाठी प्रशासनाची सक्रिय भूमिका
दरम्यान, शेतकरी प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून असून, योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
खरात कनेक्शनची चर्चा तापली! रावेर–यावलमध्ये ‘भोंदू बाबाचे’ धागेदोरे?
दौऱ्यापुरतीच स्वच्छता? यावल तालुक्यात ग्रामपंचायतींचा ‘दिखावा’ उघड








