Indian Natural Honeybees जळगाव | साक्षीदार न्यूज | शेतीमधील परागीभवन प्रक्रियेसाठी मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्याद्वारे फळबाग, भाजीपाला आणि तेलबिया पिकांचे उत्पादन लक्षणीय वाढू शकते, असे प्रतिपादन पुणे येथील इंडियन नॅचरल हनीबीजचे संचालक संजय मारणे यांनी केले.

गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकूण ४० सहभागी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन तसेच सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास यवतमाळ कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रदीप वादाफळे, अमरावतीचे दिगंबर भुयार, नाशिकचे विजय चोंडेकर, सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक पी. टी. पाटील, जामनेरचे प्रगतीशील शेतकरी एस. आर. पाटील, जैन इरिगेशन कृषी विभागाचे संजय सोन्नजे, एनर्जी पार्क सीएसओ दिपक चौधरी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, लक्ष्मण देशमुख तसेच जैन इरिगेशन वन वन्यजीव पर्यावरण विभागाचे सल्लागार राजेंद्र राणे उपस्थित होते.
मधमाश्यांचे प्रकार व उपयुक्तता
कार्यक्रमात मधमाश्यांचे विविध प्रकार समजावून सांगण्यात आले.
-
Apis cerana indica – स्थानिक भारतीय मधमाशी
-
Apis mellifera – व्यावसायिकदृष्ट्या पालन केली जाणारी मधमाशी
-
Apis dorsata (Rock Bee) – उंच झाडे व इमारतींवर उघड्यावर पोळे बांधणारी मोठ्या आकाराची मधमाशी
-
Apis florea (Little Bee) – लहान आकाराची, झुडपांवर पोळे बांधणारी मधमाशी
-
Stingless Bees – डंखरहित मधमाश्या
Apis dorsata या मोठ्या आकाराच्या मधमाश्यांचे मध उत्पादन जास्त असते; मात्र त्यांचे व्यवस्थापन नियंत्रित पद्धतीने करणे अवघड असते. Apis florea या आकाराने लहान असल्या तरी परागीभवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो.
मधमाश्यांपासून मिळणारी उपउत्पादने
मध, मेण (Beeswax), परागकण (Pollen), रॉयल जेली, प्रोपोलिस आणि बी व्हेनम (Bee Venom) यांसारख्या उपउत्पादनांचे औषधी तसेच आर्थिक महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
संजय मारणे यांनी “No Bees – No Food” ही संकल्पना स्पष्ट करत पर्यावरण संतुलनात मधमाश्यांची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी मधमाशी पालनाची देखभाल, बॉक्स व्यवस्थापन, राणी मधमाशीचे महत्त्व, रोग नियंत्रण, हंगामी काळजी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्याची उपयुक्तता याविषयी सविस्तर माहिती दिली.
संरक्षणाची शपथ
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ४० सहभागींकडून मधमाशी संरक्षणाची शपथ घेण्यात आली. सहभागीनी प्रतिज्ञा केली –
“मी मधमाश्यांचे संरक्षण करीन, पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देईन, कीटकनाशकांचा योग्य व मर्यादित वापर करीन आणि ‘No Bees – No Food’ हा संदेश समाजात पोहोचवीन.”
उपस्थितांनी कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार राजेंद्र राणे यांनी मानले.







