Unemployment Protest यावल |विकी वानखेडे | राज्यात वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर जळगावात युवकांचा संताप उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेरी नाका परिसरातील पांझरापोळ गो शाळा येथे आज सकाळी १० वाजता ‘बेरोजगार युवा संवाद मेळावा’ उत्साहात पार पडला. या मेळाव्यास लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून प्रशिक्षणार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले. भरती प्रक्रियेतील विलंब, निकाल जाहीर करण्यात होणारी दिरंगाई आणि जाहीर पदांची वेळेत पूर्तता न होणे या मुद्द्यांवर युवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
काही भरती प्रक्रिया रद्द अथवा स्थगित झाल्यामुळे उमेदवारांचे मानसिक तसेच आर्थिक नुकसान होत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कंत्राटी नियुक्त्यांमुळे नोकरीची स्थैर्याची हमी राहत नसल्याची तक्रारही समोर आली. ग्रामीण भागात उद्योगधंद्यांचा अभाव, स्थानिक रोजगारनिर्मितीची कमतरता आणि कौशल्याधारित प्रशिक्षणानंतरही रोजगार उपलब्ध न होणे या समस्या ठळकपणे मांडण्यात आल्या.
आपल्या भाषणात बालाजी पाटील चाकूरकर यांनी सरकारवर थेट टीका करत म्हटले की, “तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणे थांबवावे. केवळ आश्वासनांनी प्रश्न सुटत नाहीत. भरती प्रक्रिया पारदर्शक, गतीमान आणि वेळबद्ध असली पाहिजे. अन्यथा युवक रस्त्यावर उतरतील.”
रोजगाराच्या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी २४ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. अधिवेशन काळात आंदोलन छेडून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यातून संघटित आणि शिस्तबद्ध पद्धतीने युवकांचे पथक मुंबईकडे रवाना होणार असून, त्यासाठी तालुका स्तरावर नियोजन समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. राज्यभरातील बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
आता २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकारची पुढील भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता वाढली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्याचा समारोप एकजुटीच्या घोषणांनी आणि ठाम निर्धाराने झाला.







