Molecular Lab Inquiry | जळगाव |सुनिल भोळे | जळगाव जिल्हा रुग्णालयात गंभीर आजारांच्या निदानासाठी अत्याधुनिक ‘मॉलिक्युलर डीएनए बेस्ड टेस्टिंग प्रयोगशाळा’ (Molecular DNA Based Testing Lab) स्थापित करण्याच्या कामात अनियमितता झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत जळगाव जिल्हा नियोजन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांना याप्रकरणी चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय? जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ अंतर्गत, जिल्हा रुग्णालय जळगाव येथे सेप्सिस (Sepsis), अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स (Antimicrobial Resistance), कर्करोग पूर्व निदान (Early Cervical Cancer, Screening Precancerous Stage), लैंगिक संसर्गजन्य रोग (Sexually transmitted Disease), ॲनिमिया (Aneamia), सिकलसेल आणि बीटा थॅलेसेमिया (Sickle & Beta Thalassemia Diseases) यांसारख्या गंभीर आजारांच्या प्रगत निदानासाठी ही प्रयोगशाळा उभारण्याचे नियोजन होते. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने २८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला होता. या प्रयोगशाळेची उभारणी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून केली जात आहे.
माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश कडू भोळे यांची तक्रार या प्रयोगशाळेच्या उभारणीत आणि अंमलबजावणीत त्रुटी असल्याचा आरोप करत जळगाव येथील श्री. दिनेश कडू भोळे यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा नियोजन समितीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी कामाच्या दर्जाबाबत आणि प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जिल्हा नियोजन समितीची ॲक्शन तक्रारीची दखल घेत जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे यांनी १० एप्रिल २०२६ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांना पत्र (जा. क्र. जिनिस/जिवापो/संस-५/तक्रार/२०२६/५२९) पाठवून सक्त सूचना दिल्या आहेत. “सदर प्रकरणाची आपल्या स्तरावरून आवश्यक ती तपासणी व पुढील कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारास कळवून, त्याचा अहवाल नियोजन समितीला सादर करावा,” असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या चौकशीमुळे आता जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कामाकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, दोषींवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









