Jalgaon Forest Department साक्षीदार न्यूज | जळगाव २ मे २०२५ | जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वृक्षतोड होत असून, यामुळे पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास होत आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून, राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अनेकदा जळगावात होत आहे. यास कारणीभूत ठरणारी प्रमुख बाब म्हणजे निंबाच्या झाडांची अवैध कत्तल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
अनेक सॉ मिल्सला परवानगीच नाही ?
जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरातील सॉ मिल्समध्ये मोठ्या प्रमाणात निंबाच्या लाकडाचा साठा आढळून येत असून, याबाबत कोणतेही वैध परवाने नसल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. यासोबतच, विट भट्ट्यांवरही अवैध लाकूड पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सॉ मिल्स आणि लाकूडतोड करणाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत वनविभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई न केल्याने अवैध लाकूडतोड करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
जळगाव जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. यामध्ये अनधिकृत वृक्षतोड थांबवणे, सॉ मिल्सची चौकशी करणे आणि लाकूड वाहतुकीसाठी वैध परवान्याची सक्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना राजेंद्र निकम, विनोद शिंदे, किरण तळेले, श्रीकृष्ण मेंगडे, अविनाश पाटील, योगेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असून, याबाबत प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.