Jalgaon MIDC Police जळगाव | साक्षीदार न्यूज | शेतकऱ्यांच्या विहिरी व बोरवेलवरील विजेच्या केबल चोरी प्रकरणात एम.आय.डी.सी. पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरीतील काही मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. दि. 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास फिर्यादी नवल भटू गुंजाळ (वय 31, व्यवसाय शेती, रा. लमांजन, ता. जि. जळगाव) यांच्या शेतासह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व बोरवेलवर बसवलेल्या मोटारींच्या तांब्याच्या वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. सुमारे 19 हजार रुपये किंमतीचा हा मुद्देमाल चोरीस गेला होता.
याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गु.र.नं. 234/2026 भा.न्या.सं. 2023 चे कलम 303(2), 303(5), 317(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश वाघ, पो.हे.कॉ. 2735 ईश्वर लोखंडे, पो.हे.कॉ. 186 समाधान टहाकळे, पो.हे.कॉ. 614 किरण पाटील, पो.कॉ. 1683 कैलास पाटील आणि पो.कॉ. 2048 राहुल बोरसे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी 31 मार्च 2026 रोजी संशयित आरोपी अनिल कर्तार भिल्ल, संदीप सुभाष देवरे (रा. नागदुली, ता. एरंडोल) आणि आनंदा शांतारा कोळी (रा. वाकडी, ता. जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील चौकशीत आरोपींकडून 3,000 रुपये किमतीची 30 मीटर तांब्याची वायर आणि 5,000 रुपये किमतीचे जाळून काढलेले 5 किलो तांबे असा एकूण 8,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. 2735 ईश्वर लोखंडे, पो.कॉ. राहुल बोरसे आणि पो.कॉ. कैलास पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







