MIDC Police Bike Theft Case जळगाव | साक्षीदार न्यूज | मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात एम.आय.डी.सी. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक करत चोरीची गाडी जप्त केली आहे. दि. 03 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास फिर्यादी अरुण सखाराम अहीरे (वय 38, व्यवसाय मजुरी, रा. तांबापुरा) यांनी आपली हिरोहोन्डा स्प्लेंडर (गाडी क्रमांक MH-28 G 3256) घरासमोर उभी करून हॅन्डल लॉक केले होते. मात्र दुसऱ्या दिवशी (दि. 04 एप्रिल) सकाळी 7 वाजता उठून पाहिले असता सदर मोटरसायकल जागेवर आढळली नाही.
याबाबत फिर्यादीने शोध घेतला असता गाडी मिळून न आल्याने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुरनं. 250/2026 बी.एन.एस. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना मा.पोनि.सो. यांच्या आदेशानुसार मा.पोउपनि धनेक, पोकॉ/291 नितीन ठाकुर, पोकॉ/342 किरण पाटील, पोकॉ/677 राहुल घेटे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 12 तासांत आरोपीचा शोध घेण्यात यश आले.
या कारवाईत आरोपी साहील महोमद तडवी (वय 28, रा. मच्छीबजार, तांबापुरा, जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेली हिरोहोन्डा स्प्लेंडर (MH-28 G 3256) जप्त केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/517 मनोज घुले करीत आहेत. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







