साक्षीदार न्यूज | 26 एप्रिल | जळगाव: भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने जळगावात आयोजित शोभायात्रेची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून जोरात सुरू आहे. यंदा पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप हिंदूंची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर या शोभायात्रेत विशेष बदल करण्यात आले आहेत. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शोभायात्रा नेहमीच्या उत्साहपूर्ण वातावरणाऐवजी शांततेत आणि संयमाने काढली जाणार आहे.
शोभायात्रेत ढोल-ताशांचा गजर बंद ठेवून, “आता तोफ धडाडेल, प्रतिशोधाची ज्योत पेटेल” आणि “धर्म विचारून मारलं, आता धर्म सांगून प्रत्युत्तर देऊ” अशा घोषणांचे फलक हाती घेऊन हजारो समाजबांधव सहभागी होणार आहेत. सर्व सहभागी डोक्यावर काळ्या फिती बांधून नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापासून शास्त्री टॉवरमार्गे नेहरू चौकापर्यंत शांततेत शोभायात्रा काढतील. समाजातील सर्व जाती-जमातीच्या बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नितीन पारगांवकर आणि महिला संघाच्या अध्यक्षा वृंदा भालेराव यांनी केले आहे.
शोभायात्रेचा समारोप खान्देश सेंट्रल लॉन येथे होईल. यावेळी पव49ित्र भगव्या ध्वजाला मानवंदना दिली जाईल, भगवान परशुराम प्रार्थना होईल आणि ह.भ.प. दादामहाराज जोशी यांचे आशीर्वचन घेतल्यानंतर भगवान परशुराम यांची महाआरती होईल. यानंतर 5000 समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या जन्मोत्सवानिमित्त रविवारी, 27 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत स्व. बलदेव उपाध्याय फाऊंडेशनच्या सहकार्याने पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सायंकाळी 5 वाजता महाबळ चौकातून पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे. या रॅलीतही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाभरात परशुराम जन्मोत्सव साजरा व्हावा यासाठी नऊ तालुक्यांना भगवान परशुराम यांच्या कायमस्वरूपी मूर्ती प्रदान करण्यात येणार आहेत. या ठिकाणीही दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून शोभायात्रा काढल्या जाणार आहेत. बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नितीन पारगांवकर, वृंदा भालेराव, मनीष पात्रीकर, तेजस नाईक, अंजली हांडे, पंकज पवनीकर, सुरेंद्र मिश्रा आणि तुषार देशपांडे उपस्थित होते.