Jalgaon Police Bribery साक्षीदार न्युज । जळगाव | जळगाव शहर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला 20 हजार रुपये लाच घेताना अँटी-करप्शन ब्युरो (एसीबी)ने रंगेहाथ पकडले असून, या कारवाईमुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ माजली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका प्रकरणात सहकार्य करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. एसीबीच्या जळगाव युनिटचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा यशस्वीपणे राबवण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात जळगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याने संबंधितांची नावे अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत. परंतु लवकरच माध्यमांसमोर माहिती देण्याची शक्यता एसीबीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलिस दलातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
दरम्यान, नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर मोठ्या लाचखोरांविरुद्ध कारवाईचा वेग वाढला आहे. शुक्रवारी, ११ एप्रिल २०२५ रोजी नाशिक एसीबीने शिरपूर-देवरी आरटीओ सीमेवर एका ट्रेलर चालकाकडून प्रवेश परवानगीसाठी ५०० रुपये लाच घेताना नागपूर ग्रामीणच्या मोटार वाहन निरीक्षक योगेश गोविंद खैरनार (४६, अमरावती रोड, नागपूर) आणि दोन खासगी चालक नरेंद्र मोहनलाल गडपायले (६३, गोंदिया) व आश्लेष विनायक पाचपोर (४५, अमरावती) यांना अटक केली. ही साखळी कारवाया लाचखोरांना धडा शिकवण्यासाठी सुरू असल्याचे संकेत देतात, तरीही असे प्रकार थांबण्याचे चित्र दिसत नाही.