World Marathi Conference जळगाव | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी आपल्या सादरीकरणाने विशेष लक्ष वेधून घेतले. या संमेलनाला जगभरातील १९ देशांमधून मराठी भाषिक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
तीन दिवस चाललेल्या या भव्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी परिषदेतर्फे अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनींनी कातकरी नृत्याचे आकर्षक सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींनी हे सादरीकरण केले. त्यांच्या जोशपूर्ण नृत्याने नाशिकमधील विश्व मराठी संमेलनाच्या मंचावर जळगावचा झेंडा दिमाखात फडकवला.
या विद्यार्थिनींना ही संधी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत आणि प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांच्या प्रयत्नातून मिळाली होती. मिळालेल्या या संधीचे विद्यार्थिनींनी प्रभावी सादरीकरणातून सोने केले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिनी डिंपल चौधरी, भूमिका चौधरी, रेणुका पवार, पूर्वी भावसार, चिन्मयी जंजाळकर, स्वरा महाजन, सुंदरम चिमकर, विद्या सपकाळे, चेतन धनगर, हर्षिता निकुंभ तसेच वादक मोहित सोनवणे, ललित पवार, वेदांत जडे, रोहन चव्हाण, सचिन महाजन आणि संघप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन आणि संचालिका निशा अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतुक केले.








