जामनेर;- जामनेर तालुक्यातील लोणी, मादणी, गारखेडा व महुखेडा भागात जोरदार वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने केळी, मका, लिंबू, ही पिके जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांना नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नुकसान ग्रस्त भागास राज्याचे ग्रामविकासमंत्री व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी संबंधित विभागास पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
दि. ९ रोजी सुमारे दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी उभी असलेली पिके भुईसपाट झाली. तालुक्यात जोरदार वार्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. दुपारी चार वाजता विजेचा गडगडाट मोठ्या प्रमाणात सुरू होता. पावसा पेक्षा जोरदार वार्यामुळे काही ठिकाणी घरांची पत्रे उडून गेले आहेत.
तालुक्यातील काही भागात पिकांना मोठा फटका बसला असून केळी, लिंबू, मका यांसह शेतकऱ्यांच्या घरातील साठवुन ठेवलेला कापुस भिजला आहे. लोणी, मादणी, बोरगांव, व खडकी येथील जुगराज नाईक व किशोर नाईक यांच्या सुद्धा लिंबू व मका या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तर घरांच्या पडझडीसह शेत मजुरांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत.त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे लोणी गावातील मोतीराम उगले यांची गाय व दशरथ म्हस्की यांच्या बैलाचा म्रुत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. येथीलच पुंडलिक आहेर ज्ञानेश्वर चोपडे, विनोद गोंधळी देवराव वाघ, सुरेश मिस्तरी, यांच्या घरांवरील पत्रे उडाली आहे. याच अनंत वाणी आणी दगडु किरोते यांच्या केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सुनिल आहेर यांच्या मका पिक आडवे झाले आहे. तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे.