MLA Gopichand Padalkar | साक्षीदार न्यूज | गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चांगलाच चिघळला आहे. सांगलीतील आरेवाडी येथे हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली.
वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड
पडळकर यांनी भाषणादरम्यान प्रस्थापितांविरोधातील त्यांचा संघर्ष अधोरेखित केला. मात्र, या भाषणात जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. पाटील यांनी त्यांच्यावर “मंगळसूत्र चोरी”चा आरोप केल्याचा संदर्भ देत पडळकर म्हणाले, “जयंत पाटील, तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते ते सांगा. मी जे मुद्दे मांडले आहेत त्यावर बोला, अन्यथा असंबद्ध आरोप करू नका.”
पार्श्वभूमीत जुना संघर्ष
गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर पाटील गटाने यावरून संताप व्यक्त केला होता. या विधानानंतर पडळकर यांनी पुन्हा एकदा थेट पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करत वातावरण तापवले आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदाराकडून आलेल्या या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे. पाटील समर्थकांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पडळकर यांचा दावा
आपली लढाई केवळ प्रस्थापितांविरोधात असल्याचे पुन्हा अधोरेखित करत पडळकर यांनी म्हटले की, ते सामाजिक आणि महत्वाच्या प्रश्नांवर बोलतात. मात्र त्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी वैयक्तिक पातळीवरील आरोप केले जातात, त्यामुळे त्यांना सार्वजनिकपणे प्रत्युत्तर द्यावे लागते.