जळगाव ; – बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत फर्निचरच्या कपाटामधून सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील दर्शन कॉलनी परिसरात मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी समोर आले आहे. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत मार्तंड देशमुख वय-४५, रा. दर्शन कॉलनी जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मेडिकल दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. २८ डिसेंबर रोजी रात्री १ ते मंगळवारी २ जानेवारी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत, पुढील दरवाजाचा कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून फर्निचरच्या कपाटात ठेवलेले १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीला आला. घरमालक हेमंत देशमुख यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.