साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | राज्यात चोरीच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना आता रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अशीच एक घटना मुंबई येथील सांताक्रुजमधील वृद्धेचे दागिने लांबवून पसार होणाऱ्या बंटी-बबलीला भुसावळ रेल्वे स्थानकावर अटक केली. बुधवारी रेल्वे सुरक्षा बलाने फलाट क्रमांक पाचवरील पटना एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून त्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. यात प्रीती अनिल खरवार (२२) (रा. बंगरा किशोर चेतन बलिया, उत्तर प्रदेश) व लकीलाल भैयालाल सेट (२०) (रा. मेजाखास प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
याबाबत आरपीएफ निरीक्षक आर. के. मीना यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त श्रीनिवास राव यांना माहिती दिली की, प्रीती खरवार या महिलेने सांताक्रूज परिसरात पश्चिम मुंबई प्लॉट नंबर ३१, सेठी निवास या घरात राहणाऱ्या अरविंद गुरुविंदर सिंग यांच्या घरामध्ये ‘मेड’ ची नोकरी करत असताना वयोवृद्ध महिलेच्या बोटातील पाच लाखांची हिरेजडीत अंगठी महिलेचे तोंड दाबून काढली. यासाठी पती लकी लाल सेट यानेही मदत केली.
याप्रकरणी सांताक्रुज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकाने केली अटक गाडी क्रमांक १३२०२ डाऊन पटना जनता एक्स्प्रेस या गाडीने दोघेही पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा बलाच्या वरिष्ठांनी सोशल मीडियावर भुसावळच्या आरपीएफ यांना फोटो पाठविले. बुधवारी रात्री १०:३५ मिनिटाला गाडी फलाट क्रमांक पाचवर आली. आरपीएफ पोलिस निरीक्षक आर. के. मीना, उपनिरीक्षक के. आर. तर्ड, दीपक कवले, वसंत महाजन, सुनील सिंह, मनोज कुमार, भजनलाल यांनी गाडीचे सर्व डबे तपासले. दरम्यान सर्वात शेवटी असलेल्या जनरल डब्यात ते दिसले. ओळख पटताच दोघांना आरपीएफच्या जवानांनी ताब्यात घेतले.








