Money For Sex Husband साक्षीदार न्युज | एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या पत्नीविरुद्ध धक्कादायक आरोप करत वायलिकावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार श्रीकांत याने पत्नी बिंदूश्रीवर लैंगिक संबंधांसाठी दररोज 5 हजार रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर पत्नी आणि सासरच्या मंडळींनी आपल्याला मानसिक आणि शारीरिक छळासह ब्लॅकमेल केल्याचा दावा त्याने केला आहे. या तक्रारीनंतर बिंदूश्रीनेही पती श्रीकांत आणि त्याच्या कुटुंबीयांवर घरगुती हिंसेचा आरोप करत प्रत्युत्तरात तक्रार दाखल केली आहे.
श्रीकांत आणि बिंदूश्री यांचं लग्न ऑगस्ट 2022 मध्ये मॅट्रिमोनिअल साइटद्वारे जुळलं होतं. श्रीकांतच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वीच बिंदूश्रीच्या आईने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याने सासूच्या खात्यात 3 लाख रुपये आणि लग्नाच्या खर्चासाठी 50 हजार रुपये दिल्याचं सांगितलं. मात्र, लग्नाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी बिंदूश्री त्याच्याशी शारीरिक जवळीक ठेवायला तयार नाही. “शरीरसंबंध ठेवायचे असतील तर दररोज 5 हजार रुपये द्यावे लागतील,” असं ती सांगते, असा आरोप श्रीकांतने केला आहे. जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास ती आत्महत्येची धमकी देते आणि “तुझं नाव लिहून जीव देईन,” असं ब्लॅकमेल करते, असंही त्याने म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर पत्नीने त्याच्या गुप्तांगावर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर दावा श्रीकांतने केला आहे.
श्रीकांतने सासरच्या मंडळींवरही आर्थिक शोषणाचा आरोप केला आहे. “पत्नी आणि तिच्या आईच्या नावावर असलेल्या घराच्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी माझ्याकडे दरमहा 75 हजार रुपयांची मागणी केली जाते,” असं त्याचं म्हणणं आहे. घरून काम करताना पत्नीने मुद्दाम गोंधळ घातला आणि मिटींगदरम्यान नाचून त्याची नोकरी जाण्यास कारणीभूत ठरल्याचंही त्याने सांगितलं. या सगळ्याचे व्हिडीओ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्याने केला आहे. घटस्फोटाची मागणी केल्यावर बिंदूश्रीने पोटगी म्हणून 45 लाख रुपये मागितल्याचंही श्रीकांतने म्हटलं आहे.
दुसरीकडे, बिंदूश्रीने श्रीकांत आणि त्याच्या कुटुंबीयांवर घरगुती हिंसेचा आरोप लावला आहे. “मला मोलकरणीसारखं वागवलं जातं, हुंड्यासाठी छळलं जातं आणि बेडरुममध्ये कॅमेरा लावण्याची धमकी दिली जाते,” असं तिचं म्हणणं आहे. तिने दिराने श्रीकांतला “तिला गरोदर कर म्हणजे ती सोडून जाणार नाही,” असा सल्ला दिल्याचा दावा केला आहे. छळाला कंटाळून ती माहेरी गेली होती, पण परिस्थिती सुधारेल या आशेने परत आल्याचंही तिने सांगितलं.
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप केल्याने पोलिसांनी श्रीकांत आणि बिंदूश्री यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. हा वाद वैयक्तिक पातळीवरून कायदेशीर स्वरूपात गेल्याने समाजात वैवाहिक नातेसंबंधांबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.