Jalgaon Health Department यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्षात सुरूच झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत आजही बंद अवस्थेत असून वीज कनेक्शन, पाण्याची सुविधा आणि डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयाची सेवा सुरू होऊ शकलेली नाही.
मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, रुग्णालय सुरू नसतानाही येथे तब्बल ९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना गेल्या दोन वर्षांपासून नियमित पगार दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या संदर्भात संपर्क साधला असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयात वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरू होऊ शकली नाही. मात्र आठ दिवसांत वीज व पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल आणि डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णालयात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचारी निवासस्थानी राहत असले तरी इतर कर्मचारी भुसावळ, जळगाव आणि इतर ठिकाणांहून ये-जा करतात. काही कर्मचारी केवळ मस्टरवर सही करण्यासाठी येतात आणि काही वेळ थांबून परत जात असल्याचेही सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे शासनाची दिशाभूल झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रुग्णालय प्रत्यक्षात सुरू नसताना कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी झाली आणि दोन वर्षे त्यांना पगार कसा दिला गेला, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, किनगाव व परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी अद्याप दूरच्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेले रुग्णालय बंद आणि कर्मचारी मात्र पगारी असल्याचा प्रकार नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारा ठरत आहे.
आता प्रशासन खरोखरच वीज, पाणी आणि डॉक्टरांची व्यवस्था करून आठ दिवसांत रुग्णालय सुरू करणार का, की हा विषय पुन्हा दुर्लक्षित राहणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.








