Tribal Health Rights मालोदच्या आदिवासी बांधवांवर आरोग्य व्यवस्थेचा घाला?
यावल । मिलिंद जंजाळे । तालुक्यातील मालोद परिसरातील आदिवासी बांधवांवर आरोग्य सुविधांच्या बाबतीत मोठा अन्याय होत असल्याची संतप्त भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. किनगाव येथे ग्रामीण रुग्णालयाचे भव्य बांधकाम पूर्ण होऊन तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला असतानाही ते आजपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत असून प्रशासनाच्या उदासीन कारभारावर तीव्र टीका होत आहे.
शासनाने किनगाव येथे ग्रामीण रुग्णालय उभारल्यानंतर मालोद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी भागात हलविण्याबाबत चर्चा व हालचाली झाल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात दोन वर्षे उलटून गेली तरी हा निर्णय आजपर्यंत अमलात आलेला नाही. परिणामी ग्रामीण रुग्णालयाची इमारत अक्षरशः धूळ खात पडली असून नागरिकांच्या कराच्या पैशातून उभारलेली ही सुविधा वापराविना पडून असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या परिस्थिती अशी आहे की, ज्या खोलीत ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमची प्रक्रिया केली जाते, त्याच ठिकाणी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. मात्र पूर्ण ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील हा प्रकार नागरिकांसाठी धक्कादायक ठरत आहे.
मालोद परिसराला लागून अनेक लहान-मोठी आदिवासी गावे आहेत. या गावांतील नागरिकांना उपचारासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा गंभीर परिस्थितीतही प्रशासनाकडून दोन वर्षांपासून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या ग्रामीण रुग्णालयाला नेमके कोणाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे? शासनाने आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी उभारलेली सुविधा सुरू करण्यास प्रशासन इतकी टाळाटाळ का करत आहे? हा प्रकार जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आदिवासी समाजाच्या मूलभूत आरोग्य हक्कांकडे दुर्लक्ष करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मालोद येथे हलवून किनगावचे ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.आता संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष या प्रश्नाकडे लागले असून, दोन वर्षांपासून बंद पडलेल्या ग्रामीण रुग्णालयाबाबत प्रशासन जागे होणार का? की आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी खेळ सुरूच राहणार? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जळगावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न? पोलीस ठाण्यातच दोन गट भिडले








