Pahalgam Terror Attack साक्षीदार न्यूज | कोल्हापूर, २ मे २०२५ | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापुरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि हल्लेखोर अतिरेक्यांना कठोर शासनाची मागणी करण्यासाठी कोल्हापूर ग्राहक समितीने पुढाकार घेतला. समितीच्या वतीने या हल्ल्यातील दोषींना जाहीरपणे फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्राहक समितीच्या कार्यकर्त्यांनी करवीर येथील नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांना निवेदन सादर करून आपली मागणी नोंदवली. या निवेदनात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. निवेदन सादर करताना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड, अध्यक्ष मुश्ताक मिस्त्री, उपाध्यक्ष मनोहर लोहार, महाराष्ट्र संघटक कुमार पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दगडू खोत (आप्पा), महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी पराडकर, कोल्हापूर महिला अध्यक्षा अपर्णा पाटील, अमोल पराडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हा हल्ला देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान असून, यास जबाबदार असलेल्यांना तातडीने शिक्षा व्हावी, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. प्रशासन या मागणीवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.