Kolhapur Wedding Thief साक्षीदार न्युज । कोल्हापुरातील आदमापूर येथे एका लग्न सोहळ्यात चक्क पाहुणा बनून आलेल्या सराईत चोराने हातसफाई करत ३ लाख ७८ हजार रुपयांचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरी फेटा बांधून लग्नात रुबाबात वावरणाऱ्या या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील असे या आरोपीचे नाव आहे. तो कोल्हापुरातील आदमापूर येथील रहिवासी आहे. आदमापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका लग्न सोहळ्यात हा आरोपी पाहुणा म्हणून सामील झाला. कोल्हापुरी फेटा बांधून आणि लग्नातील गजबजलेल्या वातावरणाचा फायदा घेत त्याने दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीनंतर लग्नातील नातेवाइकांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ७८ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी
बाळासो उर्फ अजित पाटील हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोल्हापूर आणि पुणे येथे घरफोडी आणि जबरी चोरीचे एकूण २१ गुन्हे दाखल आहेत. हा भामटा चोरी केलेले दागिने आणि रोख रक्कम घरामागील गोठ्यात किंवा जमिनीखाली लपवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या प्रकरणामुळे लग्न सोहळ्यांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लग्न समारंभात अज्ञात व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.