साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना यात पुणे शहरात देखील गुन्हेगारी सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची लूटमार तसेच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. व्यापाऱ्याची लूट केल्याची अशीच एक घटना निगडी पोलीस हद्दीत घडली होती. यातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील यमुनागर या परिसरात १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान व्यापारी प्रकाश भिकचंद लोढा आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याच रस्त्यावरून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी प्रकाश लोढा यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत त्यांच्याजवळील तब्बल २७ लाख २५ हजार ८०० रुपयांची रक्कम लंपास केली.
व्यापाऱ्याने घटनेनंतर व्यापारी लोढा यांनी पोलिसात धाव घेत याबाबत रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याआधारे पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून ११ लाख ३५ हजार ४०० रुपये जप्त केले आहेत. विशाल जगताप, लालबाबू जयस्वाल, जावेद काझी, अभिषेक बोकडे आणि धीरेंद्र सिंग आसवानी सिंग अशी पाच आरोपींची नावे आहेत.