साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | गेल्या काही महिन्यापासून राज्यात ललित पाटील प्रकरण मोठे चर्चेत येत असतांना आता या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण यांनी सोने-नाणे व जमीन खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्याच्या घरातून पुणे पोलिसांनी गुरुवारी पाच किलो सोने जप्त केले. दरम्यान, पाटील बंधूंसह चौदाजणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात आला.
ललितचा भाऊ भूषण याच्या नाशिकमधील घरातून यापूर्वी तीन किलो वजनाच्या सोन्याच्या विटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोघांकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत चार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्याकडून अन्य काही जडजवाहीर व मालमत्ता हस्तगत होतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. अमली पदार्थांची निर्मिती व विक्रीप्रकरणी ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ११ आरोपी अटकेत आहेत. ललितचे साथीदार समाधान बाबाजी कांबळे (रा. नाशिक), इम्रान शेख ऊर्फ आमिर खान (रा. धारावी, मुंबई), हरिष पंत (रा. मुंबई) हे पसार झाले आहेत. पाटील याला दोन वर्षांपूर्वी चाकणमध्ये मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले होते. तेथून तो उपचाराच्या बहाण्याने ससून रुग्णालयात दाखल झाला होता. नाशिकमधील शिंदे गावात श्री गणेशाय इंडस्ट्रीज नावाने सुरू केलेल्या कारखान्यात ललित आणि साथीदार मेफेड्रॉन हे अमली पदार्थ तयार करत होते. मेफेड्रॉन निर्मिती, तसेच वितरणाची जबाबदारी आरोपींवर होती, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. तपासासाठी पाटील याच्यासोबत त्याचे साथीदार शिवाजी शिंदे, राहुल पाठक यांना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, पाटील याची व त्याच्या टोळीची कार्यपद्धती लक्षात घेता त्याच्याविरुद्ध ‘मोक्का’ची कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. सहा महिन्यांहून अधिक काळ कोणाच्या वरदहस्तामुळे पाटील याने रुग्णालयात मुक्काम ठोकला होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.