साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | राज्यात खळबळ माजवून देणाऱ्या अमली पदार्थ माफिया ललित पाटील याच्याकडून नुकतेच मला पळविले होते असा आरोप झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर तो आधी नाशिकला आला. येथे एका महिलेकडून त्याला २५ लाख रुपये पुरविले गेले. ही २५ लाखांची रसद घेऊन तो राज्याबाहेर फरार झाला, असे आता तपासात पुढे येत आहे.
मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केल्यानंतर नाशिक पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या ‘एमडी’ या अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील तपासाला गती दिली. पाटीलचे ‘एमडी’ पोचविण्यात सहभाग असलेल्या संशयितांसह त्याला आर्थिक रसद पुरविण्यात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून ७ किलो चांदी हस्तगत केली. या महिलेवर ललितला २५ लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आज पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी ही माहिती दिली. पाटील बंधूंच्या टोळीमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे पुढे येत आहे. वडाळा येथील छोट्या भाभीशिवाय ललितला फरार होण्यासाठी २५ लाख पुरविण्याच्या संशयावरून आर्थिक सूत्रधार महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिंदे गावातील कारखान्यात ५ किलो एमडी सापडण्याच्या प्रमुख गुन्ह्यात इतरांना अटक केली आहे.