साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | अहमदनगरातील कोपरगाव येथील एका चारचाकी गाडीत खेळता खेळता साडेतीन वर्षाच्या बालकाने चुकून काचवर घेण्याचे बटन दाबले व त्यात मान अडकून बालकाचा गुदमरून मृत्यू झाला. कोपरगाव शहरानजीक जेऊर पाटोदा शिवारात शनिवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली असून राघव सागर कुदळे असे मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भाऊसाहेब कुदळे याचे हे वाहन दारात उभे असताना त्यांचा नातू राघव त्या वाहनात खेळण्यासाठी गेला होता. खेळता खेळता त्याच्याकडून चुकून काच बंद करण्याचे बटन दाबले गेले. काही कळण्याच्या आत त्यात त्याची मान अडकून मृत्यू झाला. ही दुर्घटना जेव्हा घरच्या माणसांच्या लक्षात आली, त्या वेळी खूप उशीर झाला होता. मुलास कुटुंबियांनी उपचारासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.