नवी दिल्ली;– लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला असून येत्या26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 88 मतदारसंघात, तसेच मणिपूर लोकसभा मतदारसंघातील उर्वरित भागांमध्ये मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1206 उमेदवार आणि बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातून 4 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.भारतीय निवडणूक आयोगानुसार 2633 उमेदवारी अर्ज दाखल, तर 1428 वैध आढळले. सर्व 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 2633 नामांकन दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी केल्यानंतर 1428 अर्ज वैध आढळले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात केरळमधील 20 लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त 500 उमेदवारी अर्ज आहेत. यानंतर कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघातून 491 उमेदवारी अर्ज आले आहेत. त्रिपुरातील लोकसभा मतदारसंघातून किमान 14 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.
महाराष्ट्रातील 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 92 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. अकोला मतदारसंघामध्ये उमेदवार अनुप धोत्रे, कॉंग्रेस पक्षाचे डॉ. अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात तिहेरी लढत आहे. परभणीमध्ये मविआचे उमेदवार संजय जाधव तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील तर ठाकरे गटाचे संजय देशमुख उमेदवार आहेत.
वर्धा मतदारसंघामध्ये भाजपचे रामदास तडस तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे उभे आहेत. नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर तर कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण उभे आहे. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप जाधव तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर उभे आहेत. हिंगोली मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम तर शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर उभे आहे.