M S R L M साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (M S R L M) तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या अनिल बडगुजर यांनी २७ जानेवारी २०२५ रोजी आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी सोडलेल्या सुसाइड नोटमध्ये हरेश्र्वर भोई, राजू लोखंडे यांच्यासह अनेक व्यक्तींवर गंभीर आरोप केले असून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सातत्याने होणाऱ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. तीन महिन्यांनंतरही पोलिस तपासात प्रगती न झाल्याने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सुसाइड नोटमधील धक्कादायक खुलासे
अनिल बडगुजर यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये अनेक संकटांना सामोरे गेल्याचे आणि आयुष्यभर चांगले कार्य करण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. त्यांनी हरेश्र्वर भोई यांच्यावर स्वार्थासाठी काही महिलांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच, राजू लोखंडे यांनी पैशासाठी भोई यांचे ऐकून त्यांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. याशिवाय, शरद पाटील, संदीप खेडकर, रुपाली पाटील, सुरेखा पाटील, कोमल जावळे, साधना देशमुख आणि सीमा पाटील यांनी खोट्या तक्रारी करून त्यांना त्रास दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बडगुजर यांनी आपल्या मृत्यूसाठी या सर्वांना जबाबदार धरले असून, त्यांना अटक होईपर्यंत आपल्या देहाला अग्नी देऊ नये, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली आहे.
👉🏽 उमेद अभियानात मोठा घोटाळा उघडकीस येणार ?
भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि चौकशी
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. पुरवठा आणि प्रशिक्षणाची कामे विशिष्ट व्यक्तींना देणे, महिला कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक, आणि प्रकल्प संचालकांकडून कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळणे यासारख्या तक्रारींनी हे कार्यालय चर्चेत आहे. बडगुजर यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनीही मानधन कपात आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पाचोरा येथील भ्रष्टाचाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही.
नाशिक येथील उपायुक्त विकास शाखेमार्फत झालेल्या चौकशीत बडगुजर, लोखंडे आणि भोई यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारांचा उल्लेख आहे. या कारणांमुळे बडगुजर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
👉🏽 शासनाचे काम केले म्हणून कर्मचाऱ्यांना शेवभाजी / मटण पार्टी ?
पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह ?
बडगुजर यांच्या आत्महत्येला तीन महिने उलटूनही जळगाव पोलिसांनी या प्रकरणात ठोस प्रगती केलेली नाही. सुसाइड नोटमध्ये स्पष्टपणे नावे आणि आरोप नमूद असूनही पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. बडगुजर यांच्या कुटुंबीयांना तपासाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
भ्रष्टाचार उघड होणार का ?
अनिल बडगुजर यांच्या आत्महत्येने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील भ्रष्टाचाराच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. या प्रकरणात नमूद केलेल्या व्यक्तींवर कारवाई होणार का आणि बडगुजर यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस तपासाच्या प्रगतीवर आणि या प्रकरणातील पुढील घडामोडींवर जळगावकरांचे बारीक लक्ष आहे.