Devendra Fadnavis and Sharad Pawar |साक्षीदार न्यूज | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलेली बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणारी भेट. ही भेट रविवारी होण्याची शक्यता असून, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
पावसाळी अधिवेशनात नितीन देशमुख यांच्याशी संबंधित मारहाण प्रकरण आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. या घटनांवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सर्वपक्षीय आमदारांना खडेबोल सुनावले होते. त्यांनी, “राज्यातील जनता आमदारांना शिव्या देत आहे. आमदार माजले आहेत,” असे तिखट शब्द वापरले होते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत.
*LIVE : आ. एकनाथराव खडसे भाजपावर पलटवार करणार काय ?*
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीत नितीन देशमुख प्रकरणासह इतर राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी जितेंद्र आव्हाड यांचे सहकारी नितीन देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या मारहाणीच्या घटनेची माहिती पवारांना दिली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीमुळे विधिमंडळाच्या लॉबीत गोंधळ उडाला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूंमधील काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवल्याने तणाव आणखी वाढला होता. अखेर दोन्ही कार्यकर्त्यांना जामिनावर सोडण्यात आले, परंतु या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील दरी वाढली आहे.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे या तणावपूर्ण वातावरणात काही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.