Eknath Shinde Supreme Court | साक्षीदार न्यूज | शिवसेनेतील उभी फूट आणि पक्षाचे नाव तसेच ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सुनावणी १५ सप्टेंबरनंतर निश्चित होऊन ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होण्याची चर्चा आहे. या निकालामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला की उद्धव ठाकरे यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळणार, यावर शिक्कामोर्तब होईल. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या राजकीय भवितव्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
सरोदेंचा दावा काय ?
असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतानुसार, सर्वोच्च न्यायालय येत्या महिनाभरात शिंदे गटाची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द संपुष्टात आणू शकते. “कुणीही मनमानी पद्धतीने पक्ष फोडणे किंवा पळवणे ही असंविधानिक प्रक्रिया चालणार नाही. राज्यपाल, केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनी बेकायदेशीरपणे सरकार स्थापनेसाठी केलेल्या कृतींवर सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे,” असे सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रकरणाची सुनावणी कोण करत आहे ?
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. सूर्यकांत हे घटनापीठाचे सदस्य असल्याने, १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत घटनापीठाच्या सुनावणीमुळे शिवसेना प्रकरण लांबणीवर पडले आहे. त्यानंतर १५ सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या वादाचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
शिवसेनेत २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उभी फूट पडली. शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. हा वाद गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. आता या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो, अशी चर्चा आहे.