Cleanliness City जळगांव | साक्षीदार न्यूज | वार्ड क्र. 8 , दांडेकर हॉल प्रभाग 1,सिटी कॉलनी “माझे शहर माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत सिटी कॉलनी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता वॉकमध्ये नागरिकांनी स्वच्छतेसंदर्भातील विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. हा वॉक सुमारे 60 ते 70 नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

या उपक्रमात श्री संदीप वाणी, श्री राजेंद्र दत्तात्रय जोशी, गजानन महाराज संस्थेचे अध्यक्ष संतोष चव्हाण, भूषण जोशी, स्थानिक नागरिक, नगरसेविका संगीता ताई दांडेकर यांच्या वतीने त्यांचा मुलगा भूषण दांडेकर आणि विनोद सपकाळे उपस्थित होते.
वॉकची सुरुवात सुरेश क्लॉथ स्टोअर येथून करण्यात आली. परिसर मोठा असल्याने नागरिकांनी स्वच्छतेसंदर्भातील अनेक तक्रारी मांडल्या. विशेषतः घंटा गाडी नियमित येत नसल्याची समस्या नागरिकांनी मांडली. काही ठिकाणी कचरा साचल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
नागरिकांनी सांगितले की, या भागात घंटा गाडी अनेकदा एका दिवसाआड येते, तसेच काही घरांपर्यंत ती पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना कचरा साठवून ठेवावा लागतो. प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले की, पुढील काळात घंटा गाडी दररोज येईल आणि कचरा संकलन नियमित केले जाईल.

स्वच्छतेबाबत जनजागृती
या वॉकदरम्यान नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
-
डॉ. सोनाली महाजन यांनी महिलांना कचरा रस्त्यावर टाकू नये याबाबत समजावले.
-
डॉ. लीना पाटील यांनी नागरिकांना आपली सामाजिक जबाबदारी ओळखून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
-
डॉ. हेमंत पाटील आणि प्रकाश पाटील यांनी कचरा नेहमी डस्टबिनमध्येच टाकावा, असे सांगितले.
याशिवाय मदन जी लाठी, विशाल पवार आणि सुहास दुसाने यांनीही नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद

या भागात काहीवेळा कचरा व्यवस्थापनावरून कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद होत असल्याचेही निदर्शनास आले. यावर दोन्ही बाजूंनी समन्वय राखल्यास परिस्थितीत सकारात्मक बदल घडू शकतो, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
पुढील निर्णय
सिटी कॉलनी परिसरातील स्वच्छता प्रश्न सोडवण्यासाठी पुढील चार शनिवारीही याच परिसरात वॉक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमात नगरपालिका आरोग्य विभाग, SI, कांबळे तसेच BVG संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी परिसरातील डॉ. स्वप्नजा मोरे देखील उपस्थित होत्या.








