साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३ | राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण गुरुवारी स्थगित करण्यात आल्यानंतर पाटील रुग्णालयात दाखल होते मात्र आता ते पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. उद्या किंवा परवा ते याबाबतची घोषणा करणार आहे. तसेच, सरकारचे शिष्टमंडळ उद्या सोमवारी मनोज जरांगेंची पुन्हा रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाची डेडलाईन कोणती याबाबत शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात मनोज जरांगेंवर उपचार सुरू असून आज माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, माझी तब्येत आता चांगली आहे. मी ठणठणीत आहे. कुणीही काळजी करु नये. मात्र, आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. आता चांगले दिवस आले आहे. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा काय असणार याबाबत माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले, मी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे. त्यांना मराठा आरक्षणा मागची आपली भूमिका समजावून सांगणार आहे व पुढील लढाई अधिक जोमाने लढण्यासाठी त्यांना तयार करणार आहे. तसेच, मराठा आरक्षण व आंदोलनाची धग तेवत ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णयही जरांगेंनी जाहीर केला.