साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | राज्यात गेल्या दहा दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी गुरुवारी रात्री उपोषण सोडले असून ते आता छत्रपती संभाजीनगर शहरातील चेतक घोडा चौक परिसरातील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब आणि शर्करा पातळी कमी झाली असून अशक्तपणा जाणवत आहे. रुग्णालयात त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत.
निदानानुसार किडनीवर काही प्रमाणात सूज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचाराला ते उत्तम प्रतिसाद देत असून आणखी पंधरा दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. सध्या जरांगे यांना शारीरिक हालचाल करण्यास आणि बोलण्यास मर्यादा येत आहेत. राज्यभरातील दौरे आणि उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे.
जरांगे यांना भेटण्यासाठी रुग्णालयात नागरिकांची गर्दी झाली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या विनंतीनंतर जरांगे यांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. पोलीस प्रशासन जरांगे यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवत आहेत.