जळगाव :– शहरातील मालमत्ताधारकांनी एप्रिल किंवा मे महिन्यात मालमत्ता कर भरल्यास मालमत्ताधारकांना १० टक्के सुट देण्यात येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १ कोटी २० लाख रूपयांची सुट देण्यात आली होती.
सन २०२३-२४ मध्ये २१ हजार ७४६ मालमत्ताधारक नागरिकांनी घरपट्टी व पाणी पट्टीची रक्कम एप्रिल व मे महिन्यात भरल्याने त्यांना महापालिकेकडून १ कोटी २० लाख रुपयांची सूट देण्यात आली होती. सदर मालमत्ताधारकांनी १७ कोटी रूपयांचा कर महापालिकेला भरल्यामुळे त्यांना ही १० टक्के सवलत मिळाली होती. यावर्षी देखील दि. ३१ मेपर्यंत घरपट्टी व पाणी पट्टी भरणाऱ्या नागरिकांना १० टक्के सुरु देण्यात येत असून या सवलतीला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता महिलेच्या नावाने असल्यास महिलांना आणखी ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तांना एकुण १५ टक्के सुट मिळणार आहे.
अनेक मालमत्ताधारकांचे मोबाईल नंबर व पत्ता अपडेट नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर भरण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून आता दि.२२ पासून नागरिकांना आपआपले मोबाईल नंबर व पत्ता ऑनलाईन अपडेट करता येणार आहेत. नागरिक त्यांच्या मोबाईवरून देखील हे अपडेट करू शकता किंवा मनपाच्या प्रभाग समिती कार्यालयांमध्ये जाऊन देखील नागरिकांना
माहिती अपडेट करता येणार आहे.
महापालिकेने मालमत्ता कर भरण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक बदल केले असून ज्या नागरिकांकडे थकबाकी आहे. त्या नागरिकांना दर महिन्याला एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. तसेच जून महिन्यात सर्व मालमत्ताधारकांना ऑनलाईन पध्दतीने बिल पाठविण्यात येणार आहे .