साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील शिवसेना व मनसे पक्ष नेहमीच मराठी पाट्याबाबत नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतात. पण सध्या घाटकोपरमध्ये देखील मराठी गुजराती वाद पेटला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच मनसे कार्यकर्त्यांकडून घाटकोपरमध्ये गुजराती फलक तोडण्यास सुरुवात करण्यात आलीये.
शिवसेना कार्यकर्त्यांनी घाटकोपरमधील एका उद्यानाचा मारो घाटकोपर हा गुजराती बोर्ड आज सकाळी तोडला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या विविध ठिकाणच्या गुजराती पाट्या तोडल्यात. घाटकोपर पूर्वेकडील आर बी मेहता मार्गावरील चौकाला गुजराती पाटी लावण्यात आली होती. ती पाटी देखील कार्यकर्त्यांनी तोडलीये.
शिवसेना मनसे कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने चौकात तोडफोड केल्याने भाजपने याचा निषेध व्यक्त केलाय. शिवसेना आणि मनसेने ज्या पद्धतीने तोडफोड केलीये ते चुकीचे असल्याचं भाजपनं म्हटलंय. ज्याठिकाणी तोडफोड करण्यात आलीये तेथे जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत चौकातील फलक पुन्हा लावण्यात यावेत अशी मागणी केलीये.
भाजप आमदार प्रविण छेडा यांनी निषेध व्यक्त करत म्हटलं की, गुजरात्यांना टार्गेट केलं जातंय. आर बी मेहता हे कोण होते यांना माहित आहे का? शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास तोडण्याचा अधिकार कोणाला आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शिवसेना आणि मनसे हे एकमेकांमध्ये स्पर्धा करतायत. त्या नादात त्यांनी गुजरात्यांना टार्गेट केलंय हे चुकीचं आहे. मुंबईमध्ये सर्व भाषिक लोक राहतात. निवडणुका आल्या म्हणून हे तुम्ही करत आहात का? असा प्रश्नही छेडा यांनी विचारला आहे. आमदार पराग शहा यांनी देखील या प्रकरणी नाराजी व्यक्त केलीये.