IMD साक्षीदार न्युज | ३० सप्टेंबर २०२५ | देशभरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता ऑक्टोबरमध्येही नवं संकट उभं राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या 115% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सप्टेंबरचा पाऊस आणि नुकसानीचा वारसा
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक राज्यांतील शेतमालाचे मोठे नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेली, काढणीपूर्वीच शेतकरी अडचणीत आले. आता ऑक्टोबरमध्येही मुसळधार पावसाचा इशारा दिला गेल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
मान्सून लांबला, संकट वाढले
सामान्यतः भारतात पावसाळा सप्टेंबर अखेरीस संपतो. मात्र यंदा मान्सून लांबला असून देशाच्या काही भागात अजूनही पावसाची तीव्रता कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस पडणार आहे.
पावसाचे कारण काय ?
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे ओले वारे जेव्हा उत्तर भारतातील थंड वारे आणि पश्चिमेकडील विक्षोभांशी टक्कर देतात, तेव्हा मुसळधार पाऊस पडतो. यंदा जागतिक तापमानवाढीमुळे हवामान प्रणाली अधिक सक्रिय झाल्या आहेत, त्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे.
पिकांवर धोका आणि शहरी भागात अडचणी
ऑक्टोबरमध्ये भात, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांची काढणी केली जाते. मुसळधार पावसामुळे या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रोगराई वाढण्याचा धोका आहे. शहरी भागातही पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
शेतकऱ्यांसाठी उपाययोजना गरजेच्या
या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. विमा भरपाई, तातडीची मदत आणि पिकांचे संरक्षण यावर भर देण्याची आवश्यकता आहे.