साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांच्या सरकारमधील अनेक आमदारासह मंत्र्यांना गेल्या काही महिन्यापासून येत असलेल्या धमकीमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले असतांना नुकतेच अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना धमकी आल्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे. ‘मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं आहे, अशी पहिली प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.
छगन भुजबळ यांनी काल धमकी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ म्हणाले, ‘मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाहीतर अनेकवेळा येत आहेत. जिवंत राहणार नाही, तुझी वाट लावू, अशा आशयाच्या धमक्या येत आहेत. तसेच शिवीगाळ सुरू आहे. मात्र, अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही. पोलिसांत तक्रार केली आहे, आता पोलीस काय ते बघतील’.
‘शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. मी ओबीसीच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली. मला मराठ्यांनी मोठे केले असे सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलं आहे. मला मराठा समाजाची मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत काम केलं आहे, असे छगन भुजबळ पुढे म्हणाले. ‘माझं देखील काहीतरी योगदान आहे. त्यामुळे मला संधी दिली. माझा समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे. मी एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही. मी ओबीसीसाठी काम करत आहे. मला महादेव जानकर यांनी समर्थन दिले असून मी त्यांचा आभारी आहे. सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचे काम आहे, असे भुजबळ पुढे म्हणाले.