Maharashtra Assembly News मुंबई | साक्षीदार न्यूज | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी अकोला व आकोट येथील चार पत्रकारांविषयी गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दि. १२ मार्च २०२६ रोजी विधानसभेत मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावात त्यांनी संबंधित पत्रकारांची कसून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार प्रकाश भारसाखळे यांनी आपल्या वक्तव्यात अकोला शहरातील वृत्तवाहिन्यांचे पत्रकार उमेश अलोने व अक्षय गवळी, तसेच वृत्तपत्राचे पत्रकार रवी मोरे आणि पोर्टल पत्रकार संजय आठवले यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या पत्रकारांनी आपला बिश्नोई टोळीशी संबंध जोडून खंडणी मागितल्याच्या बातम्या प्रकाशित केल्या, मात्र त्या संदर्भात कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा त्यांनी केला.
आधीच्या घटनांमुळे चर्चेला उधाण
काही दिवसांपूर्वी अकोला पूर्वचे आमदार साजिद खान पठाण यांना खंडणी मागणारा धमकीचा फोन आल्याची घटना समोर आली होती. त्या संदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती आणि पत्रकार परिषद घेऊन ही बाब जनतेसमोर मांडली होती.
दरम्यान, एका भाजप पदाधिकाऱ्यालाही खंडणी मागणारा फोन आल्याची चर्चा सुरू झाली होती. या फोनमध्ये आमदार प्रकाश भारसाखळे यांच्याकडून खंडणी मिळवून देण्याची धमकी दिल्याचा दावा केल्याचे बोलले जात होते. या चर्चेमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गाजू लागले.
राजकीय वर्तुळात निर्माण झाले गूढ
या घडामोडींमध्ये आमदार प्रकाश भारसाखळे काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नसल्याने त्यांच्या बाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, ते आकोट मतदारसंघातील मुंडगाव येथे एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून आले.
यानंतर त्यांनी मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजेरी लावून हा मुद्दा हक्कभंग प्रस्तावाद्वारे मांडला.
गंभीर आरोप आणि चौकशीची मागणी
विधानसभेत बोलताना आमदार प्रकाश भारसाखळे यांनी सांगितले की, संबंधित पत्रकार ब्लॅकमेलिंगचे प्रकार करत असून त्यांनी बिश्नोई टोळीशी आपला संबंध असल्याचे खोटे वृत्त प्रसिद्ध केले. त्यांनी असा आरोपही केला की, हे लोक आपली सुपारी देऊन आपला जीव धोक्यात घालू शकतात.
तसेच रवी मोरे आणि संजय आठवले यांची नावे पोलीस रेकॉर्डवर असल्याचा दावा करत त्यांनी या चौघांची सखोल चौकशी करून त्यांना दंडित करण्याची मागणी केली.
विधानसभाध्यक्षांचे निर्देश
आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांनी संबंधित प्रकरणाचा अहवाल मागवून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणामुळे अकोला आणि आकोट परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून पुढे या प्रकरणात काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








