साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली होती आणि यावर अनेक नेते प्रतिक्रिया देत होते. तोच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार मिटकरी हे आंबेडकर यांच्या भेटीला गेले. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये बंददारामागे चर्चा झाली आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज अकोल्यातील बाळासाहेबांच्या ‘यशवंत’ निवासस्थानी ही भेट झाली आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. कधी उद्धव ठाकरे, तर कधी शरद पवार यांच्याशी चर्चा करतात. कालच्या दसऱ्या मेळाव्यात तर भास्कर जाधव यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भीमसेनेने एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आगामी काळात कोणासोबत जाणार, याची चर्चा राजकीय राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
या भेटीसंदर्भात मिटकरींना विचारले असता, ही कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती. धम्मचक्र परिवर्तन दिन आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बाळासाहेबांना सलग पाच वर्षापासून त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी येत असतो आणि यंदाही आलो आहे. सामाजिक दृष्टिकोनातून ही भेट असल्याचं आपण समजावं, असे मिटकरी म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही भेट विजयादशमीनिमित्त होती, विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्या देण्यासाठी मिटकरी आले होते. विशेष म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी आले असतानाही तुम्ही त्याला राजकीय भेट म्हणत असाल तर हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.