Muktainagar जळगाव | साक्षीदार न्यूज | जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांच्या हाती मोठी कारवाई लागली आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने अवैधरित्या गुटखा आणला जात होता, तो पकडण्यात यश आले. बुधवारी पोलिसांनी सुमारे ७७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आली.
गुप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशातून जळगाव जिल्ह्यात गुटखा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने खबरदारी घेतली. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील पुरनाड फाटा परिसरात नाकाबंदी लावण्यात आली. त्यावेळी एक भरधाव वेगात जाणारे मालवाहू वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहनाला थांबण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन थांबवले नाही आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर, सारोळा फाट्याजवळ पोलिसांनी त्याला गाठून ताब्यात घेतले.
वाहनाची झडती घेतल्यानंतर पोलिसांना आतील भागात पोतडीत भरलेला ७७ लाख रुपयांचा गुटखा सापडला. या कारवाईत पोलिसांनी एकूण एक कोटी दोन लाख ३३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये २५ लाख रुपयांचे मालवाहू वाहन आणि १२ हजार रुपयांचा मोबाइल फोन यांचा समावेश आहे.
या प्रकरणी आशिष जयस्वाल (रा. देवास, मध्यप्रदेश) या चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच वाहन मालक आशिक खान (रा. नागपूर) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुटख्याच्या उत्पादन, साठवण आणि वाहतुकीवर पूर्णतः बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक जयेश पाटील, सोपान गोरे आणि पोलीस कर्मचारी सलीम तडवी, छगन तायडे, रतन गीते, मयूर निकम, भरत पाटील, देश पाटील, भाऊराव घेते, राकेश धनगर आणि संदीप धनगर यांचा सहभाग होता.
जळगाव जिल्ह्यात गुटखा आणि तंबाखूवर बंदी असूनही ती फक्त नावापुरती राहिल्याचे दिसते. शहरांपासून ते गावांपर्यंत खुलेआम पान टपऱ्यांवर गुटख्याची विक्री होत आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारातही गुटखा विकला जात असल्याच्या तक्रारी आहेत. आंतरराज्यीय सीमांवर तपासणी असूनही गुटखा महाराष्ट्रात येत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. आता पोलीस प्रशासन याविरुद्ध धडक मोहीम राबवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.