साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | राज्याच्या राजकारणात ठाकरे व शिंदे गटात सुरु असलेला वाद अगदी जगजाहीर झालेला आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. ललित पाटील प्रकरणाने राज्याचे राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते. या अटकेनंतर पुन्हा एकदा ललित पाटील प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
“ललित पाटीलला अटक झाली चांगले झाले, पण काही प्रश्नांची उत्तरे येणे अपेक्षित आहे. भाजप या गोष्टीचा श्रेयवाद घेत असेल तर फरार झाली यांची जबाबदारी पण गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी घ्यायला हवी. अशा शब्दात अंधारेंनी निशाणा साधला. तो नाशिकमध्ये कारखाना कसा उभा करु शकतो. बाकी सगळ्या घडामोडी कशा घडू शकतात..” असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला. तसेच “पक्षभूमिका राष्ट्रप्रथम असेल तर तरुण, आरोग्य आणि भवितव्य याचा विचार करावा. आता या घटनेचा तपास करायला हवा,यामध्ये राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाईंची नार्को टेस्ट करा” असेही अंधारे यावेळी म्हणाल्या.
यावेळी पुढे बोलताना “आज फडणवीस पुण्यात आहेत, ज्या हॉटेलमधून ललित पाटीलने पलायन केले, त्याच लेमनट्री हॉटेल मध्ये फडणवीस येणार आहेत ,तिकडे बैठकही होणार आहे.. ” असेही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. तसेच राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून ललित पाटीलचा जय सिंघानिया होऊ नये.. असा टोलाही अंधारेंनी लगावला.