Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar साक्षीदार न्युज | पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा विलीनीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच पुण्यात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना याबाबत सूचक विधान केले आहे. दोन्ही गटांतील नेत्यांची विचारधारा एकच असल्याने भविष्यात एकत्र येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, हा निर्णय आता पक्षाच्या नव्या नेतृत्वावर सोपवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या गटासोबत पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांनी सांगितले की, पक्षातील काही नेत्यांना पुन्हा एकत्र येण्याची इच्छा आहे. “दोन्ही गटांच्या विचारधारेत फरक नाही. त्यामुळे भविष्यात एकत्रीकरण झाले तर आश्चर्य वाटणार नाही,” असे त्यांनी नमूद केले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षातील सध्याच्या नेत्यांनी घ्यावा, असेही ते म्हणाले. या विधानाने पक्षातच नव्हे, तर पवार कुटुंबीयांमध्येही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या या विधानावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवार यांच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पवार यांची नेमकी विचारधारा काय, हे त्यांनाच विचारावे लागेल,” अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. दुसरीकडे, अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी एकत्रीकरणाला पाठिंबा दर्शवला. “दोन्ही गट एकत्र आले तर आनंदच होईल,” असे ते म्हणाले. मात्र, नुकतेच शरद पवार गट सोडून अजित पवार गटात दाखल झालेले उमेश पाटील यांनी काही नेत्यांचा अहंकार आड येऊ शकतो, असे मत व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या राजकारणात सत्तेची भूक नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. शरद पवार गटातील काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी दबाव टाकत असल्याचे समजते. सोलापूरच्या काही आमदारांनी याबाबत पत्रही लिहिल्याची माहिती आहे. परंतु, अजित पवार सध्या भाजपसोबत युतीत असल्याने पुरोगामी विचारधारेच्या नेत्यांपुढे पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोरील निर्णय सोपा नाही. शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय आता सुप्रिया सुळे आणि पक्षातील अन्य नेत्यांवर अवलंबून आहे. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीचे राजकारण पुन्हा एकत्र येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.