JalgaonCrime जळगाव | साक्षीदार न्यूज | तालुक्यातील निमखेडी गावातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हिंसेत झाले असून, पतीने आपल्या पोटच्या तीन मुलांच्या आईची लोखंडी विळ्याने वार करून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी (१९ मार्च) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिपाली नितीन सोनवणे (वय २८) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेने तीन निष्पाप मुले पोरकी झाली आहेत.
वादाची ठिणगी आणि रक्ताचा सडा मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी येथील रहिवासी नितीन विजय सोनवणे (वय ३५) हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात पत्नी दिपाली, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या नितीनने घरात असलेल्या लोखंडी विळ्याने दिपाली यांच्या मानेवर आणि पोटावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, रक्तबंबाळ झालेल्या दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्येची कबुली देत आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर पत्नीची हत्या केल्यानंतर परिसरात पळापळ न करता, आरोपी नितीन सोनवणे याने थेट जळगाव तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांसमोर शरणागती पत्करली. घटनेची भीषणता पाहता, पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक पथकासह निमखेडी गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिपाली यांचा मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.
तीन चिमुकल्यांचे छत्र हरपले अवघ्या २८ वर्षांच्या दिपाली यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने निमखेडी गावावर शोककळा पसरली आहे. आईची हत्या झाली आणि वडील पोलीस कोठडीत गेल्यामुळे दोन मुले आणि एका मुलीच्या डोक्यावरचे छत्र एका क्षणात हरपले आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.








